परवा एका मित्राचे डोळ्याचे ऑपरेशन झाले,
त्याआधी एकाचे प्रोस्टेडचे,व त्याआधी एकाने गुडघ्याच्या वाट्या बदलल्या.
आज तुमच्या-माझ्या शरीरामध्ये हक्काचा असलेला एक अणू देखील निरुपयोगी नाही
आणि आश्चर्य म्हणजे यापैकी एकाचाही spare part कुठेही उपलब्ध नाही.
हे शरीर कोणी निर्माण केलं?, का केलं? ह्या प्रश्नाची उत्तरं ज्याने त्याने आपापल्या क्षमतेने शोधण्याचा प्रयत्न जरूर करावा.
सहज आरश्याकडे बघा. मग म्हणाल ‘what a fine art is this!’
सुंदर दृश्य बघण्यासाठी तब्बल दोन डोळे,
ऐकण्यासाठी दिलेले रेखीव कान, ज्ञानसृष्टीतला प्रवेशमार्ग म्हणजे शेकडो आकारांचे साचे असलेले नाक, आणि एका मुरलेल्या अभियंत्याने घडवावे असे ह्या ना त्या कामी येणारे इतर अवयव, निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा विचार करून बनवलेले हे एकमेव कोलाज, ‘शरीर!’
ज्या क्षणी पहिल्यांदा या शरीराची blueprint तयार झाली असेल तो क्षण आज पर्यंतच्या
नवनिर्मितीचा उच्चांक असेल असे मला वाटते.
त्या अभियंत्याने पाचही बोटं एका सरळ पट्टीत निर्माण न करता, प्रत्येकाच्या उपयोगा नुसार किंवा योग्यते नुसार त्याची उंची ठरवली, हालचाल ठरवली. शरीराला वेगात ठेवण्यासाठी सगळ्यात बलवान आणि मोठा स्नायू पायाचा निर्मित केला, उत्तम अन्न आत आलं तर जीवन पुढल्या दिवशी सुरळीत चालेल.
आयुष्यात शरीर साधना कमावली तर उतारवयात ते साथ देईल, ह्यालाच ‘investment’चे सूत्र म्हणायचे ना.?
हे शरीर कधीच तकलादू माल स्वीकारत नसते, मनाचा विवेक वेगळा परंतु शरीराला स्वतःचा असा एक विवेक आहे. काय घ्यावे? काय टाकावे? कसला साठा करावा? याचे उत्तम व्यवस्थापन शरीरात चालू असते.
यातही एखाद्या जागतिक कंपनी सारखी उलाढाल सुरु असते. शरीरातही मालक, मजूर असे वर्ग आहेत. घडणाऱ्या सगळ्या योजना ‘मेंदू’ ठरवीत असतो आणि त्या पार पाडण्याचे काम इतर अवयव सानंदाने करत असतात, एकही सुट्टी न मागता किंवा सणांचे बोनसही न मागता.!!!
थोर अभियंत्याने दिलेले शरीर हे सत्कर्मात झिजवावे, या सारखी त्याला वाहिलेली कृतज्ञतेची पुष्पपाकळी दुसरी कुठलीही नाही….
जय हो.